Sagar Karande Cyber Fraud: विनोदी अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची सायबर फसवणूक झाल्याचा दावा; सोशल मिडियावर बातमी व्हायरल, जाणून घ्या सत्य
अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाइक करून दीडशे रुपये मिळवा, या प्रलोभनाला सागर बळी पडला. त्याला फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरुन जाहिरातीची माहिती प्राप्त झाली. यामध्ये इन्स्टाग्राम लिंकला लाइक करण्याचे काम असून, प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, असे नमूद केले होते.
सध्या सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, 'चला हवा येऊ द्या' फेम विनोदी अभिनेता सागर करंडे याची 61 लाखांची सायबर फसवणूक झाली आहे. अनेक मराठी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाइक करून दीडशे रुपये मिळवा, या प्रलोभनाला सागर बळी पडला. त्याला फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरुन जाहिरातीची माहिती प्राप्त झाली. यामध्ये इन्स्टाग्राम लिंकला लाइक करण्याचे काम असून, प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, असे नमूद केले होते. या ऑफरला सागरने होकार दिला आणि त्या अंतर्गत सुरुवातीला त्याने काही रक्कम भरली. पुढे विविध कारणांनी पैसे गुंतवायला लावून सायबर भामट्यांनी त्याची लाखो रुपयांची फसवणूक केली. मात्र कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे त्याचा लक्षात आले व त्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.
या वृत्ताची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही, कारण त्याबाबत काही ठोस माहिती समोर आलेली नाही. यासह झी 24 तासने एक वृत्त दिले असून, त्यामध्ये अभिनेता असलेल्या सागर कारंडेची फसवणूक झाली नसल्याचे नमूद केले आहे. झी 24 तासने म्हटले आहे की, ही बातमी समोर आल्यानंतर सागर कारंडेने त्यांना दिलेल्या माहितीमध्ये, ‘ज्या सागर कारंडेबरोबर हा सारा प्रकार घडला तो सागर कारंडे मी नाहीच,’ असे सांगितले आहे. यासह खोट्या बातम्या देणाऱ्यांना आपण नोटीस पाठवणार असल्याचेही अभिनेता सागर कारंडेने त्यांना स्पष्ट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)