पंढरपूरात विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन ही 'शेवटची इच्छा' असणार्या तरूण डॉक्टराची दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अशी झाली पूर्ण; वाचा या हृद्य भेटीची कहाणी
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी राजाराम आणि विठूरायाची भेट घडावी यासाठी स्ट्रेचरसह त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास मदत केली.
विठू भक्त, वारकरी दरवर्षी कित्येक हजारो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरामध्ये विठ्ठल- रूक्मिणी च्या दर्शनाला हजर होत असतात. पण काल या मंदिरामध्ये काल देवाची आणि त्याच्या एका भक्ताची हृद्य भेट झाली आणि क्षणभर सारेच गहिवरले. सोलापूर चे रहिवासी डॉ. राजाराम ज्ञानेश्वर होमकर हे विठू भक्त आहेत. ते काही आजारपणामुळे बिछान्याला खिळले आहेत. शरीराचा कोणताच अवयव ते हलवू शकत नसल्याने त्यांना दर्शनाला जाणं शक्य नव्हतं. मात्र त्यांनी कुटुंबाला आपली शेवटची इच्छा ही विठू दर्शनाची आहे असं म्हटलं होतं.
काल (15 फेब्रुवारी) दिवशी दुपारी होमकर कुटुंब आणि त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिकेतून या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले. मात्र शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांना व्हील चेअरमधून मंदिरात नेणे शक्य नव्हते. मंदिरातही केवळ व्हील चेअर मधून भक्ताला आत मध्ये जाण्याची मुभा आहे. अशामध्ये निराश झालेल्या राजाराम होमकर यांच्या वडिलांनी नामदेव पायरीच्या दर्शनावरूनच मागे फिरावं लागेल असे ठरवले. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या जगात काहीच अशक्य नाही याची पुन्हा प्रचिती आली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी राजाराम आणि विठूरायाची भेट घडावी यासाठी स्ट्रेचरसह त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यास मदत केली. जेव्हा पोशाख बदल वेळेस मंदिरात दर्शनाची रांग ठेवली होती तेव्हा राजाराम होमकर या विठू भक्ताला दर्शन करण्याची मुभा देण्यात आली. Vitthal Rukmini Vivah Sohala Live: वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळा येथे पहा लाइव्ह.
विठू दर्शनानंतर डॉ. राजाराम आणि त्याच्या सोबत असलेल्या होमकर कुटुंब व त्याच्या मित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी होमकर कुटुंबाला विठ्ठल जोशींनी विश्वास दिला की प्रयत्न करत रहा एक दिवस डॉ. होमकर स्ट्रेचर वरून नाही तर स्वतः चालत विठू दर्शनाला येतील.