धक्कादायक! शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटातून निघाले तीन किलो लोखंड; सहा महिन्यांपासून खात होता नटबोल्ट्स, खिळे, चमचे आणि पिन्स
हा किस्सा ऐकल्यानंतर कोणतीही व्यक्ती विचलित होईल. मात्र ही गोष्ट खरी आहे
गुजरातच्या अहमदाबादमधील (Ahmedabad) बापूनगर (Bapunagar) परिसरात एक अजब घटना घडली आहे. या घटनेमुळे फक्त गुजरातमध्येच नाही तर संपूर्ण भारतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिथे एखाद्या सामान्य व्यक्तिला काही चुकीचे काही गिळल्यानंतर प्रचंड भीती वाटते, तिथे एका 28 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून चक्क नाणी, नटबोल्ट्स, खिळे, चमचे, स्पार्क प्लग, हेअरपिन, सेफ्टी पिनसह एकूण 452 वस्तू (Metal Objects) मिळाल्या आहेत. हा किस्सा ऐकल्यानंतर कोणतीही व्यक्ती विचलित होईल. मात्र ही गोष्ट खरी आहे, अशाप्रकारे डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून तब्बल तीन किलो लोखंड बाहेर काढले आहे.
अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राज्यातील अशा प्रकारची पहिलीच घटना समोर आली आहे. ही व्यक्ती मानसिक रूग्ण होती, ज्याचे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण अचानक त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलच्या ईएनटी वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या व्यक्तीलाही ओटीपोटातही वेदना होत होत्या. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सर्जिकल वॉर्डमध्ये हलविण्यात आले. जेव्हा या व्यक्तीचा एक्स-रे काढला गेला तेव्हा मिळालेले रिझल्ट पाहून डॉक्टर हैराण झाले. कारण त्यावेळी डॉक्टरांना या रुग्णाच्या पोटात अशा प्रकारच्या धातूच्या वस्तू आढळल्या होत्या. (हेही वाचा: लोखंड खाण्याची सवय? शस्त्रक्रिया करून पोटातून काढले तब्बल 116 खिळे, लोखंडी तुकडे आणि वायर)
त्यानंतर तत्काळ डॉक्टरांकडून या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यात 78 स्क्रू, 17 बॉल पेन कॅप्स, 19 कटर ब्लेड, 6 हेअरपिन, 8 सेफ्टी पिन, 26 नटबॉल्ट्स आणि दुचाकीचे स्पार्क प्लग तसेच इतर लोखंडी गोष्टी अशा एकूण 452 वस्तू काढण्यात आल्या. याबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले. ‘या व्यक्तिला एकुफेजिया आजार असल्याचे समजते. एकुफेजिया हा आजार एक मानसिक रोग समजला जातो. या आजारात रुग्ण धातुच्या पदार्थांना अन्न मानून त्यांचे सेवन करतो.’ डॉक्टरांच्या मते ही व्यक्ती गेले सहा महिने अशा प्रकारच्या वस्तू खात होती. ऑपरेशननंतर या रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. डॉ.कल्पेश परमार, डॉ.वशिष्ठ जलाल, निवासी डॉ. निसर्ग शहा आणि निवासी डॉ. आकाश पटेल यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.