20 वर्षांपासून दर महिन्याला तरुणाच्या लघवीतून येत होते रक्त; तपासणी केला असता समोर आले धक्कादायक सत्य
गेल्या वर्षी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर चेनवर 3 तासांची शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील महिलांचे अवयव काढण्यात आले.
मानवी शरीर खूप विचित्र आहे. आपल्या शरीराशी संबंधित असे अनेक पैलू आहेत ज्याबद्दल आपल्याला नीट माहितीही नसते. काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येक मानवी शरीरात सारख्या असतात, परंतु काही गोष्टी नैसर्गिकरित्या एखाद्या व्यक्तीमध्ये भिन्न असतात, ज्याची या लोकांना कल्पनाही नसते. नुकतेच असेच काहीसे एका चिनी (China) पुरुषासोबत घडले. या 33 वर्षीय पुरुषाच्या गेले 20 वर्षे लघवीतून रक्त येत होते ज्याचे कारण त्यालाही माहित नव्हते. मात्र जेव्हा तपासणी केले त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आले.
डेली मेल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनमधील सिचुआन प्रांतात राहणाऱ्या 33 वर्षीय ‘चेन ली’च्या (नाव बदलले आहे) सुमारे 20 वर्षांपासून दर महिन्याला काही दिवस पोटात तीव्र वेदना होत होत्या. इतकेच नाही तर काही दिवसांपासून दर महिन्याला त्याच्या लघवीतून रक्त येत होते. त्याच्या या विचित्र अवस्थेमुळे तो खूप चिंतेत होता, त्यामुळे त्याने याबाबत डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे ठरवले.
चेनची तपासणी केली असता समोर आलेला प्रकार पाहून डॉक्टर चक्रावूनच गेले. चेनच्या शरीरात महिलांचे अवयव असल्याचे दिसून आले होते. डॉक्टरांच्या मते चेनच्या शरीरात नर आणि मादी दोघांचेही अवयव होते. म्हणजेच चेनमध्ये पुरुषांच्या लैंगिक अवयवासोबतच, स्त्रियांचे गुणसूत्र, अंडाशय आणि गर्भाशयही होते. डॉक्टरांनी असेही सांगितले की, मागील 20 वर्षांपासून मासिक पाळीमुळे चेनच्या लघवीतून रक्त येत होते आणि यामुळेच त्याच्या पोटातही दुखत होते. (हेही वाचा: Unique Hairstyles: विचित्र केशरचना, डोक्यावर कोरला घोडा; हेअर स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
याधी अॅपेंडिक्समुळे चेनच्या पोटात दुखत असल्याचे डॉक्टरांना वाटत होते. गेल्या वर्षी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर चेनवर 3 तासांची शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील महिलांचे अवयव काढण्यात आले. चेनचे सर्जन लुओ जिपिंग यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट वेबसाइटशी बोलताना सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर आता चेनची स्थिती ठीक आहे. डॉक्टरांनी असेही सांगितले की, आता चेन एक पुरुष म्हणून आपले जीवन जगू शकतो. परंतु त्याचे अंडकोष शुक्राणू तयार करू शकत नसल्यामुळे तो पिता बनू शकत नाही.