महिलेने घरात पाळले होते तब्बल 140 साप; मृत्युसमयी गळ्यात आढळला 8 फुटाचा अजगर
तिने एकूण 140 साप आपल्या घरात पाळले होते. परंतु यापैकीच एक साप तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे.
साप पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानला जातो. सामान्यत: साप हे पाळीव प्राणी नाहीत, मात्र जगाच्या पाठीवर असे अनेक लोक आहेत जे सापांचा सांभाळ आपल्या मुलांप्रमाणे करतात. अनेक लोकांचा साप पाळणे हा छंद असतो. इंडियाना येथील 36 वर्षीय लॉरा हर्स्टनेही (Laura Hurst) असे केले. तिने एकूण 140 साप आपल्या घरात पाळले होते. परंतु यापैकीच एक साप तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. इंडियाना प्रांतातल्या ऑक्सफोर्ड शहरात ही घटना घडली आहे. बुधवारी हर्स्टचे शेजारी डॉन मुन्सन यांनी पोलिसांना हर्स्ट आपल्या घरात झोपी गेलेल्या स्थितीत असल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच पोलिसांनी हर्स्टच्या घराची पाहणी केली तेव्हा, गळ्यात आठ फूट अजगर गुंडाळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. पोलिस प्रवक्ते किम सर्जंट यांचे म्हणणे आहे की, सापाने हार्स्टवर हल्ला केला असावा आणि त्याच झटापटीत तिचा मृत्यु झाला असावा. मात्र हर्स्टच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नक्की काय घडले ते स्पष्ट होईल. हर्स्टच्या घरात एकूण 140 साप होते, त्यापैकी 20 साप स्वत: हर्स्टने विकत घेतले होते.
(हेही वाचा: व्हिडिओ: उडणारा साप दाखवून 'तो' करायचा उदरनिर्वाह; भुवनेश्वर वन विभागाने केली कारवाई)
मीडिया रिपोर्टनुसार, हर्स्टच्या गळ्याला वेटोळे घालणारा जो साप आढळला तो विषारी नव्हता. या प्रजातीचे साप आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. या सापांच्या जवळजवळ 30 प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती तर जगातील सर्वात जुन्या सापांपैकी एक आहेत.