Zero Scrap Mission: भंगार साहित्याची विल्हेवाट लावून मध्य रेल्वेने कमावला तब्बल 45.29 कोटीचा महसूल
आता भंगार विक्रीचे वार्षिक उद्दिष्ट 300 कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
महत्त्वाकांक्षी ‘झिरो स्क्रॅप मिशन’बाबतची (Zero Scrap Mission) आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. एप्रिल आणि मे 2023 मध्ये, रेल्वेने भंगार साहित्याच्या विल्हेवाटीच्या माध्यमातून तब्बल 45.29 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मे 2023 मध्ये 22.69 कोटी रुपयांच्या भंगार विक्रीसह, मे पर्यंतची एकत्रित भंगार विक्री अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. ही 40 कोटींच्या समानुपातिक उद्दिष्टापेक्षा 13.23% जास्त आहे.
हे परिणाम प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेडमधून भंगार काढून टाकण्याचा रेल्वेचा निर्धार दर्शवतात. आता भंगार विक्रीचे वार्षिक उद्दिष्ट 300 कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. (हेही वाचा: MRF Share Price Record: 'बिग बूल' एमआरएफ समभागाची गगनभरारी, भारताच्या इतिहासात प्रथमच गाठली गेली प्रति Stock एक लाख रुपये किंमत)
मुंबई (माटुंगा वर्कशॉप), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूरसह मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये भंगार साहित्याची विक्री विविध ठिकाणी झाली. विकल्या गेलेल्या भंगार वस्तूंच्या वर्गीकरणात EMU कोच, ICF कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर विविध साहित्य समाविष्ट आहे. अशाप्रकारे ‘झिरो स्क्रॅप मिशन’ मध्य रेल्वेचे विभाग, वर्कशॉप्स, शेड आणि डेपोमध्ये परिश्रमपूर्वक राबवले जात आहे.
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भंगार साहित्याच्या विक्रीला चालना देऊन, रेल्वेचे उद्दिष्ट केवळ महसूल मिळवणे इतकेच नसून, कार्यक्षम परिचालन वातावरण सुनिश्चित करणे हे देखील आहे. ‘झिरो स्क्रॅप मिशन’ साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेचे सततचे प्रयत्न पर्यावरणीय शाश्वतता आणि संसाधनांच्या ऑप्टिमायझेशनच्या वचनबद्धतेचे उदाहरण देतात. या स्तुत्य उपक्रमामुळे, रेल्वे वाहतूक क्षेत्रातील इतर घटकांसाठी एक सकारात्मक उदाहरण प्रस्थापित करत आहे.’