आमदार संतोष बांगर यांच्याशी तापाने फणफणार्या यशचा फोन झाला पण भेटीची इच्छा अधुरीच राहिली; उपचारात अकाली मृत्यूने सारेच हळहळले
सकाळी हॉस्पिटलला भेटायला यायचं आश्वासनही दिलं. पण त्या रात्रीच यशची प्रकृती अजून खालावली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तापाने फणफणत असलेल्या चिमुकल्या यशने आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याशी व्हिडिओ कॉल वर बोलत भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आमदार बांगर यांनीही या मुलाला उपचारादरम्यान धीर मिळावा म्हणून सध्या बाहेरगावी आहे पण लवकरच येऊन भेटतो असा शब्द दिला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. या चिमुकल्याने रात्री उपचारादरम्यानचं जीव सोडला. या हृद्यद्रावक घटनेनंतर सारेच हळहळले आहेत.
यश हा हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी या गावात राहत होता. 3-4 दिवसांपासून त्याला ताप होता. तो काही कमी होत नव्हता. ताप उतरत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी यशला हॉस्पिटल मध्ये नेले. मुलाने आमदार संतोष बांगर यांच्यासोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यशच्या वडिलांनीही मुलाची इच्छा आमदारांना व्हिडिओ कॉल करून पूर्ण केली.
आमदार बांगर यांनी मुलाला पुढील उपचारामध्ये धीर यावा म्हणून कॉलवर यशशी बोलून त्याला काळजी घेण्याचं आवाहन केले. सकाळी हॉस्पिटलला भेटायला यायचं आश्वासनही दिलं. पण त्या रात्रीच यशची प्रकृती अजून खालावली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यशला उपचारासाठी नांदेडला नेताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सारेच हळहळले. आमदार बांगर यांनीही शोक व्यक्त केला आहे.
संतोष बांगर हे कळमनुरीचे आमदार आहेत. त्यांच्या बिनधास्त अंदाजाची सर्वत्र चर्चा असते. सुरूवातीला उद्धव ठाकरेचे समर्थक असलेले बांगर शिवसेना फुटीनंतर शिंदे विधानसभेत पोहचल्यानंतर त्यांच्या गटाला समर्थन देणारे आमदार होते.