पुणे-बंगळूरू महामार्ग सुरु झाल्याने कोल्हापूरसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ; बससेवा अजूनही ठप्प
अखेर आज हा महामार्ग अवजड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी हा रस्ता सुरु करण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जाणाऱ्या सुमारे 37 हजार 500 एसटी बस फेऱ्या रद्द केल्या आहेत
कोल्हापूर. सांगली. सातारा महाराष्ट्रातील तीन महत्वाचे जिल्हे आता पुराच्या विळख्यातून सुटण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्याने शहराचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यात पुणे-बंगळूरू महामार्ग (NH 4) पाण्याखाली गेल्याने मदत पोहोचण्यात अडचण येत होती. अखेर आज हा महामार्ग अवजड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी हा रस्ता सुरु करण्यात आला आहे. मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जाणाऱ्या सुमारे 37 हजार 500 एसटी बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.
एनएच 4 सुरु झाला असला तरी, नागरिकांनी या मार्गावरून जाण्याचा हट्ट करू नये असे आवाहन काल दीपक म्हैसकर यांनी केले होते. महामार्गावर शिरोली फाट्यावर 5-7 इंच पाणी होते त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. आता या मार्गावरून पुर्ग्रास्तांकडे मदत आणि रसद सुरु झाली आहे. काल दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, दुध, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. अखेर आज पाणी कमी होत असल्याने ट्रक सोडण्यात आले. (हेही वाचा: पूरग्रस्तांना 5 हजार रोख तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; मंगळवारपासून सुरु होणार प्रक्रिया)
महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मदत पुरवायला सुरुवात केली आहे. आता अखेर ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या मार्गावर अजून बस सेवा सुरु करण्यात आलेली नाही., त्यामुळे हा मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना 5 कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.