Mumbai Local Trains: मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार? रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली 'अशी' माहिती
याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईत (Mumbai) अटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली लोकल 1 फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढल्याचे पाहायला मिळाली. तेव्हापासूनच मुंबईतील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. यामुळे मुंबई लोकल पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच पुन्हा एकदा सर्व ट्रेन सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ट्रेन सॅनिटाईज करायला सुरुवात करण्यात आली आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी 300 तिकीट खिडक्या सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला 1300 फेऱ्या चालवल्या जात आहेत. आम्ही राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करत आहोत, असेही ठाकूर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय
लोकल बंद होण्याची परस्थिती उद्भवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करुन लोक ऐकत नसतील तर, कारवाई होणारच. हॉटेल, नाईट क्लबवर कारवाई सुरु आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठीच हा प्रयत्न आहे. तसेच लॉकडाऊन नको असेल तर, मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. रुग्णसंख्येतील वाढ कमी झाली नाही तर काय आणि कोणते बदल करावे लागतील? यावर मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार असल्याचेही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे.
मुंबईत मंगळवारी (23 फेब्रुवारी) 643 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली होती. तर, 3 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 30 हजार 531 वर पोहचली आहे. यातील 3 लाख 681 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 11 हजार 449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.