शिर्डीमधून का गायब होत आहेत लोक? मानवी तस्करी नाही, तर 'हे' आहे कारण; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
वर्षभरात लाखो लोक साईबाबांच्या दर्शनसाठी शिर्डीत दाखल होतात. मात्र सध्या या शहरावर भीतीचे सावट पसरले आहे. एका वर्षात शिर्डी येथून तब्बल 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
महाराष्ट्रातील शिर्डी (Shirdi) हे भारतासह जगभरातील भक्तांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. वर्षभरात लाखो लोक साईबाबांच्या दर्शनसाठी शिर्डीत दाखल होतात. मात्र सध्या या शहरावर भीतीचे सावट पसरले आहे. एका वर्षात शिर्डी येथून तब्बल 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी काही लोक सापडले आहे, मात्र बाकीचे अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. उच्च न्यायालयाने मानवी तस्करीची शंका व्यक्त करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत माहिती देताना शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी शिर्डीत मानवी व्यापार होत नसल्याचे सांगितले आहे.
2017 मध्ये मनोजकुमार सोनी यांची पत्नी शिर्डी येथून बेपत्ता झाली होती. खूप शोध घेतल्यावरही त्या सापडल्या नाहीत, त्यानंतर त्याबाबत त्यांनी शिर्डी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 2018 या एका वर्षात 88 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी बहुतेक स्त्रिया असून, शिर्डी येथे दर्शनासाठी आल्यानंतर त्या गायब झाल्या आहेत. मात्र याबाबतचे स्पष्टीकरण देताना वाकचौरे म्हणाले, ‘घरातील भांडण, कमी मार्क्स, पती-पत्नीमधील वाद, प्रेम प्रकरणे अशा अनेक कारणांमुळे या व्यक्ती गायब झाल्या आहेत.’ (हेही वाचा: धक्कादायक! शिर्डीत तब्बल 88 लोक अचानक गायब, महिलांचा जास्त समावेश; मानवी तस्करीची शंका व्यक्त करत कोर्टाने दिले चौकशीचे आदेश)
ते पुढे म्हणाले, ‘ज्या व्यक्ती सापडल्या त्यांच्याकडून गायब होण्याची अशी अनेक कारणे मिळाली आहेत. भाषेचा अडथळा हे देखील एक कारण आहे. त्यामुळे शिर्डीत कोणत्याही प्रकारचा मानवी व्यापार अथवा तस्करी होत नाही.’ गेल्या दोन वर्षांत शिर्डीमधून गायब झालेल्या 64 व्यक्तींचा अजूनही शोध लागला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना विशेष युनिट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अजुपाबाजूचा परिसरातही तपास चालू आहे.