महाराष्ट्रात Covid-19 लसीची कमतरता असताना राजेश टोपेंच्या जालन्याला मिळाले अधिक डोसेस? जाणून घ्या काय म्हणतात आरोग्यमंत्री
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या गृहजिल्ह्याला 77,000 डोसेस देण्यास सांगितले होते
महाराष्ट्रात कोविड-19 (COVID-19) च्या वाढत्या घटनांमुळे सरकारने लसीकरण (Vaccination) मोहिमेवर भर दिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीची कमतरता भासत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद पडलेली दिसून येत आहेत. अशात एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, इतर जिल्ह्यांमध्ये लसींची कमतरता असताना राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालनामध्ये (Jalna) अतिरिक्त लसींचे वाटप केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 7 ते 9 एप्रिल दरम्यान, जेव्हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लसीकरण केंद्रे बंद करावी लागली तेव्हा, जालनामध्ये आणखी किमान दहा दिवस पुरेल इतका लससाठा होता.
अहवालात असे नमूद केले आहे की जालना जिल्ह्यात 17,000 व अधिक 60,000 लसीचे डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या गृहजिल्ह्याला 77,000 डोसेस देण्यास सांगितले होते. अहवालानुसार राज्य लसीकरण अधिकारी डॉ. डी.एन. पाटील यांनी 1 एप्रिल रोजी औरंगाबादहून जालन्याकडे 60,000 डोस वळविले. परंतु 7 ते 9 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला लसीचा अधिक पुरवठा करावा, असे आवाहन केले. त्यानंतर, टोपे यांनी जालना येथून जवळपासच्या जिल्ह्यात 15,000 डोस हस्तांतरित करण्यास परवानगी दिली.
जालनाच्या शेजारच्या जिल्ह्यात चांगली कामगिरी करूनही कमी डोस मिळाले असल्याचीही तक्रार आहे. अहवालात म्हटले आहे की, बीडला 1 एप्रिल रोजी 30,800 डोस प्राप्त झाले, तर लातूरला 53,800 डोस मिळाले आणि परभणीला 21,500 डोस मिळाले. या अहवालात अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्राकडून महाराष्ट्रात लसीचा मोठा पुरवठा झाल्याने टोपे यांनी 31 मार्च रोजी जालनाला अधिक साठा देण्याचा आग्रह धरला होता. (हेही वाचा: Hospital Bed Availability Online: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये रूग्णालयांत COVID-19 Emergency वेळी उपलब्ध Vacant ICU, Oxygen Beds ची इथे पहा माहिती)
याच मुद्द्यावर विरोधी पक्षानेही हल्ला केला होता. मात्र, टोपे यांनी हा दावा फेटाळून लावत सांगितले की, लसीकरणाच्या बाबतीत एका ठराविक जिल्ह्याला प्राधान्य दिले जात नाही. अधिक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जालनाला अधिक साठा मिळाला. त्यांनी असेही नमूद केले की लस घेणा-या एकूण 27 टक्के लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत जालनाने त्यावेळी फक्त 18.1 टक्के कामगिरी केली होती.