Raj Thackeray On Hindi Compulsory: आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा
'आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
Raj Thackeray On Hindi Compulsory: राज्यातील मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सरकारने आज राज्यातील पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा (Hindi Compulsory) असेल, असा निर्णय जाहीर केला. मात्र, आता यावर मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जहरी टीका केली आहे. 'आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे,' असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांचा सरकारला कडक इशारा -
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा - Hindi Compulsory In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू)
भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ -
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे. (हेही वाचा, Unauthorized Schools in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यास धोका; राज्यातील जवळपास 4,000 अनधिकृत शाळांबद्दल MESTA ने व्यक्त केली चिंता)
मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे -
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत -
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)