Vinayak Mete Last Rites: विनायक मेटे यांच्यावर 15 ऑगस्टला बीड मध्ये होणार अंत्यसंस्कार

दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार होणार आहेत.

विनायक मेटे | File Image

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्यावर बीड (Beed) मध्ये अंतिम संस्कार होणार आहेत. उद्या 15 ऑगस्ट दिवशी विनायक मेटेंना अखेरचा निरोप दिला जाईल. खालापूर टोल नाका पार केल्यानंतर मुंबईकडे येताना त्यांच्या गाडीला डाव्या बाजूने ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मेंदूला जबर धक्का बसल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. नवी मुंबईच्या एमजी रूग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तोपर्यंत उशिर झाला होता.

शिवसंग्राम कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज (14 ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत विनायक मेटे यांचे पार्थिव एअर अ‍ॅम्ब्युलंस द्वारा बीड मध्ये त्यांच्या घरी नेले जाईल. उद्या 15 ऑगस्ट दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थिव शिवसंग्राम भवन मध्ये अंत्य दर्शनाला ठेवले जाईल. दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार होणार आहेत. आज मुंबई मध्ये दुपारी 2-4 या वेळेत विनायक मेटे यांचं पार्थिव मुंबईतील त्यांचं वडाळा मधील भक्ती पार्क येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. नक्की वाचा: Vinayak Mete यांच्या अपघाती निधनामुळे RPI तर्फे चैत्यभूमी येथे आयोजित आजची तिरंगा रॅली रद्द .

विनायक मेटे यांच्या निधनानंतर हा अपघात आहे की घातपात याचा तपास करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तपासासाठी पोलिसांना कसून चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी 8 पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. खालापूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. यामध्ये सकाळी 5 पूर्वी त्यांची कार खालापूर टोल नाक्यावरून पुढे गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अपघातानंतर तासभर त्यांना मदत न मिळाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे. मदत का मिळाली नाही याचा देखील तपास केला जाणार आहे.

काल रात्री बीड मधून विनायक मेटे हे मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत होते. मात्र या भेटी पूर्वीच त्यांचं निधन झालं आहे. मागील काही वर्षांपासून विनायक मेटे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत होते.