Vasant More: तात्या अजूनही ठामच! राज ठाकरे काय भूमिका घेणार?

आपण आपली भूमिका बदलणार नाही', असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिसरात तात्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

Pune MNS | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांना पुणे मनसे (MNS) अध्यक्षपदावरुन हटविण्यात आली. त्या जागी आता साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर वसंत मोरे (Vasant More) हे मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याच्या बातम्यांना बळ मिळाले. मात्र, आपण कार्यकर्ता असून पक्षातच राहणार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इतके सगळे झाल्यानंतरही 'आपल्या प्रभागात भोंगे लावायचे नाहीत या भूमिकेवर आपण ठाम आहोत. आपण आपली भूमिका बदलणार नाही', असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिसरात तात्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

वसंत मोरे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जोरकसपणे मांडताना म्हटले आहे की, आम्ही लोकप्रतिनीधी आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना संर्वांना सोबत घ्यावे लागते. त्यामुळे मी भोंग्यासंदर्भात जी भूमिका आगोदरच घेतली होती. त्याच भूमिकेवर आजही कायम आहे. पक्षात खांदेपालट होत असते. त्यामुळे त्याबाबत मला काही वाटत नाही. पक्षातून माझी हकालपट्टी झालेली नाही. मी आजही पक्षातच आहे. मला शहराध्यक्ष पदावर राहायचे नाही असे मी यापूर्वीच राज ठाकरे यांना सांगितले होते, असेही मोरे यांनी म्हटले आहे. राजसाहेबांसोबत मी पाठीमागील 27 वर्षे सोबत आहे. त्यामुळे साहेब माझ्या हृदयात आहेत. पक्ष सोडण्याबाबत अद्याप तरी विचार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Vasant More Pune MNS: वसंत मोरे यांना पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवले,साईनाथ बाबर यांच्यावर नवी जबाबदारी; राज ठाकरे यांचा मोठा निर्णय)

दरम्यान, साईनाथ बाबर यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावर निवड होताच. वसंत मोरे यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. इतकेच नव्हे तर फेसबुकवर 'आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई' असे म्हणत शुभेच्छाही दिल्या आहेत.