PMPML बस मध्ये मध्यरात्री एकट्या पडलेल्या महिलेसाठी मनसेचे वसंत मोरे झाले दीर; बसच्या चालक, वाहकाचंही सोशल मीडीयात कौतुक!  पहा नेमकं घडलं काय?

वसंत मोरेंनी हा प्रकार शेअर केल्यानंतर नेटकर्‍यांनीही त्यांचं आणि वाहक, चालकांचं कौतुक केले आहे.

Vasant More| PC: Facebook

महाराष्ट्रासह देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे. रात्री-अपरात्री महिलांसोबत अघटित घडल्याच्या बातम्या समोर येत असताना पुण्यात पीएमपीएमएल च्या बस चालक आणि वाहकाने केलेल्या एका प्रकाराचं सध्या सोशल मीडीयात मोठं कौतुक होत आहे. मनसे पुण्याचे वसंत मोरे(Vasant More) यांनी हा प्रकार फेसबूक वर शेअर करत सार्‍या समोर आणून 'थोडे तरी शहाणे व्हा...' असा सल्ला दिला आहे. लहान मुलगा आणि काही बॅगा घेऊन रात्री पावणे बाराच्या सुमारास कात्रज कोंढवा राजस चौकात एक महिला बस मध्ये ताटकळत असताना तिच्या मदतीला वसंत मोरे दीर म्हणून धावून आले आणि तिला घरी सुखरूप पोहचवले.

वसंत मोरेंनी लिहलेल्या फेसबूक पोस्ट मध्ये रात्री भटक्या कुत्र्यांना खायला द्यायला बाहेर पडलेल्या वसंत मोरेंना कात्रज कोंढवा राजस चौक परिसरात एक बस सार्‍या लाईट्स लावून थांबलेली दिसली. बसचा चालक सीटवर होता तर चालक बस भोवती फेर्‍या मारत होता. वसंत मोरेंनी नेमकं काय झालं याची विचारपूस केली तेव्हा एक महिला एकटीच मुलासोबत आहे. तिला नेण्यासाठी दीर येणार होता पण तो आलेला नाही आणि रिक्षा देखील मिळत नाही अशा परिस्थितीत तिला एकटीला सोडून बस पुढे कशी नेणार? असं चालक त्यांना म्हणाला. मग वसंत मोरे स्वतः त्या महिलेचे दीर झालेत असं सांगून तिला आपल्या गाडीतून घरी सोडून आले.

वसंत मोरे यांनी रात्री मुलासोबत ताटकळत असलेल्या महिलेसाठी काळजी व्यक्त करणार्‍या बस चालक आणि वाहकांचेही आभार मानले आहेत. "नागनाथ नवरे" आणि "अरुण दसवडकर" अशी त्यांची नावं असल्याचंही पोस्ट मध्ये शेअर केले आहे. BEST च्या अ‍ॅप मध्ये येणार 'Home Reach' फीचर; महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न .

वसंत मोरेंनी हा प्रकार शेअर केल्यानंतर नेटकर्‍यांनीही त्यांचं आणि वाहक, चालकांचं कौतुक केले आहे.