बहुजन वंचित आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर; लक्ष्मण माने यांनी मागितला अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा राजीनामा
दरम्यान, लक्षमन माने यांनी बहुजन वंचित आघाडीत गोपीचंद पडळकर यांना देण्यात आलेल्या महासचिव पदावर आक्षेप घेतला आहे. अर्थात माने यांनी पडळकर यांचे नाव न घेता टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवल्यानंतर विधानसभा निवडणूक 2019 मध्ये चांगलाच भाव वधारलेला असताना वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) नेतृत्वात फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. संघटनेतील नेते लक्ष्मण माने (Lakshman Mane) यांनी थेट संघटनेचे शिर्ष नेतृत्व आणि संघटना समन्वयक अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाच आव्हान देत राजीनामा मागितला आहे. संपूर्ण बहुजन वंचित आघाडी ही आपल्यासोबत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी संघटनेतील समन्वयक पदाचा राजीनामा द्यावा असे माने यांनी म्हटले आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा रंगली आहे.
लक्ष्मन माने यांनी केलेल्या विधानामुळे केवळ बहुजन वंचित आघाडीच नव्हे तर एकूण राज्याच्या राजकारणातच खळबळ उडाली आहे. दरम्यान, लक्षमन माने यांनी बहुजन वंचित आघाडीत गोपीचंद पडळकर यांना देण्यात आलेल्या महासचिव पदावर आक्षेप घेतला आहे. अर्थात माने यांनी पडळकर यांचे नाव न घेता टीका केली आहे.
लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपाच्या लोकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला याचा थेट फायदा झाला आहे. आघाडी ही आता बहुजनांची राहिली नसून उच्चवर्णीयांची झाली आहे. माने यांनी पडळकर यांचे थेट नाव घेतले नसले तरी, त्यांच्या बोलण्याचा रोख हा पडळकर यांच्याकडेच असल्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिशी बोलताना गोपिचंद पडळकर यांनी लक्ष्मन माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील समीकरण बदलणार?)
दरम्यान, या वादावर बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘वंचित आघाडीत अठरापगड जातीने लोक आहेत. त्यामुळे लक्ष्मण मानेंकडून अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली गेली असेल. वंचित आघाडीत मी एकटा नसून इतरही अनेक नेते आहेत. लक्ष्मण माने हे देखील वंचितचे नेते असून ते पक्षात कायम राहतील.'