कॉमेडियन अग्रिमा जोशुआ विरोधात एका यूट्युबरकडून अश्लील भाषेचा वापर; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे आदेश
एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ (Agrima Joshua) हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. जोशुआचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर अग्रिमा जोशुआने याप्रकरणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली होती. मात्र, आता याच प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. जोशुआला विरोध करताना एका तरुणाने थेट तिला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भातील ट्विटअभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) याने गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना टॅग करत हा व्हिडिओ पोस्ट केला होता. महिलांना सन्मान देण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली आहे. तसेच व्हिडीओतील व्यक्तीविरुद्ध नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करा, असाही आदेश अनिल देशमुख यांनी दिला आहे.
यूट्युबर शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला आहे. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तसेच त्याने इतरांनाही असे करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात राहणारी एक महिला म्हणून अशाप्रकारे बलात्काराची धमकी देणारे मोकाट फिरत असल्याने मला भिती वाटत आहे. यासंदर्भात काहीतरी करा”, असे ट्विट स्वराने देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची माहिती देणाऱ्या ट्विटवर केले होते. हे देखील वाचा- गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
"महिलांना सन्मान देण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलीय. पण कुणी महिलांविषयी चुकीची भाषा वापरत असेल किंवा धमकावत असेल तर, अशांसाठी कायदा आहे. महाराष्ट्र सायबर पथकाने या व्हिडिओची पडताळणी करावी. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनी व्हिडीओतील व्यक्तीविरुद्ध नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी", असे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
अग्रिमा जोशुआ काय म्हणाली होती?
मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचे होते. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा! मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळे महाराष्ट्राचे भले होईल, असे या निबंधामध्ये लिहिले होते. तर, दुसऱ्या एकाला वाटले की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर, एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असे लिहिले होते… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केले, असे अग्रिमा म्हणाली होती.