केंद्र शासनाच्या 'किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजने'अंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय - छगन भूजबळ
केंद्र शासनाच्या 'किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजने'अंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितले आहे.
केंद्र शासनाच्या 'किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजने'अंतर्गत महाराष्ट्रात मका (Maize) व ज्वारी (Sorghum) खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले आहे. राज्यात यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भरड धान्याची खरेदी होत नसे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये मका आणि रब्बीची जास्त प्रमाणात लागवड होत असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यामुळे रब्बी हंगामात भरड धान्याची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 25 हजार मेट्रीक टन मका आणि 15 हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. मका पिकासाठी प्रती क्विंटल 1760 रुपये तर संकरित ज्वारीसाठी 2550 व मालदांडी ज्वारीसाठी 2570 रुपये आधारभूत किंमत मिळणार असल्याचं छगन भूजबळ यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'एक दीर्घ श्वास' या प्रबोधन चित्रफितीचे यशोमती ठाकुर यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन)
दरम्यान, राज्य सरकारने या आठवड्यात कांदा खरेदीला परवानगी दिली आहे. नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यात 50 हजार टन कांदा खरेदी होणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधून खुल्या लिलाव पद्धतीने, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिवार खरेदी पद्धतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी बाजार समितीमधून कांद्याची खरेदी सुरू झाली आहे.