Coronavirus: कोरोनामुळे MPSC-UPSC ची परीक्षा देऊ न शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देणार? - उदय सामंत
त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.
Coronavirus: कोरोनामुळे MPSC-UPSC ची परीक्षा देऊ न शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्याचं आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाच्या परीक्षा, युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी उदय सामंत यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येणार आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)
याविषयी अधिक माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी एक वयोमर्यादा ठरलेली असते. परंतु, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा होणार की, नाही याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या, तर यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी, यासाठी त्यांची वयोमर्यादा 1 वर्ष वाढवून देणं गरजेचं आहे. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
उदय सामंत यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिल्यास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या एप्रिल महिन्यात परीक्षा होत्या, त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी वेळ मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. तसेच पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे.