Kisan Kathore: भाजप आमदार किसन कथोरे यांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू
या अपघातात किसन कथोरे थोडक्यात बचावले आहेत.
भाजपचे (BJP) आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांच्या गाडीचा अपघात (Car Accident) झाला आहे. या अपघातात कथोरे थोडक्यात बचावले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून बदलापूरकडे येत असताना संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला हा अपघात झाला. या अपघातात मरण पावलेल्यामध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर कथोरे यांचे अंगरक्षक, स्वीय साहाय्यक सुखरूप आहेत. या अपघाताची माहिती होताच कथोरे यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ माजली.
रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून किसन कथोरे हे अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूरकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला धडक दिली. पिकनिकहून येणाऱ्या दुचाकीवरील तरुण तरुणीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित सिंग आणि सिमरन सिंग अशी मृतांची नावे आहेत. हे कल्याणच्या नेतीवली परिसरातील राहणारे होते. या अपघातात कथोरे किरकोळ जखमी झाले होते. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Mumbai: सँडहर्स्ट रोड स्टेशन वर महिलेला वाचवण्यासाठी RPF जवानाची रेल्वे रुळावर उडी (Watch Video)
किसन कथोरे यांनी मुरबाड मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर अंबरनाथ मतदारसंघातून विजय मिळवला. 2008 साली मतदारसंघ फेररचनेत अंबरनाथ मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यानंतर कथोरे यांनी 2009 च्या निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीतही मुरबाड मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.