वादग्रस्त अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली
मात्र आता परत एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची आता एड्स नियंत्रण मंडळावर पाठवणी करण्यात आली आहे
वादग्रस्त अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिकवरून बदली झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेत स्थानीक कार्यकर्त्यांनी मुंढे यांच्या बदलीचा जोर धरला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नाशिकवरून थेट मंत्रालयात त्यांची बदली केली. मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता परत एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची आता एड्स नियंत्रण मंडळावर पाठवणी करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची एक महिन्यापूर्वीच नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन मंत्रालयात बदली करण्यात आली. मात्र ते मंत्रालयात आपल्या कामावर रुजू झाले नव्हते. यानंतर त्यांची पुन्हा अन्यत्र बदली करण्याच्या किंवा त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजत होते. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी तुकाराम मुंढेची नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा : तुकाराम मुंढे यांच्यावर मोठी जबाबदारी; मंत्रालयात सह सचिव म्हणून नियुक्ती)
नियोजन विभागत बदली झाल्यानंतर मंत्रालयातील अनेकांचे धाबे दणाणले होते. अनेक वरिष्ठांना ते आपल्या विभागात नको होते, त्यामुळे त्यांची पुन्हा बदली करण्याच्या हालचाली आतल्या गोटात चालू होत्या. शेवटी वरिष्ठांसमोर सरकारनेही हात टेकवून एड्स नियंत्रण मंडळात त्यांची बदली केली.
याआधी मुंढे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, परिवहन विभागाचे प्रमुख अशा अनेक उच्च पदांचा कार्यभार सांभाळला आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी कामाची शिस्त, नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे, कायद्याची कडक अंमलबजावणी असे त्यांचे व्यक्तिमत्व राहिल्याने अनेक राजकारणे आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. याच कारणामुळे गेल्या 12 वर्षांत त्यांच्या 11 वेळा बदल्या झाल्या होत्या, आताची ही त्यांची 12 वी बदली आहे.