Raigad: रायगड येथे लग्न वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला; चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
ही घटना रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे आज सायंकाळी (8 जानेवारी) 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.
रायगडमध्ये (Raigad) लग्न वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे आज सायंकाळी (8 जानेवारी) 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 61 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मृतांच्या आकड्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाड, महाबळेश्वर आणि खेड येथून चार ट्रॅकर्सच्या टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि महसूल प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 6.30 च्या सुमारात कुडपण गावात एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नकार्यासाठी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी या ठिकाणाहून वऱ्हाड आले होते. लग्न आटोपून हे वऱ्हाड परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा ट्रक दरीत कोसळली. या ट्रकमध्ये 80 हून अधिक जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. हे देखील वाचा- रत्नागिरी: कशेडी घाटात भीषण अपघात; खाजगी बस 50 फूट दरीत कोसळून एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
या अपघतात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. परंतु, अंधार पडत चालल्याने आणि पावसामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.