गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री
गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकराची मोहिम तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी केली असता ते आपल्या हातात नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे
सध्या राज्यभरात रुबेला लसीकरण मोहीम राबवली जात आहे. शालेय विध्यार्थ्यांना ही लस देणे बंधनकार आहे असे सांगून जबरदस्तीने ही लस दिली जात आहे. मात्र या लसीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यातच गोवर व रुबेला प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेश डोंबाळे (रा. औज, ता. दक्षिण सोलापूर) याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. तसेच आणखी काही विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकराची मोहिम तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यावर उत्तर देत ही आरोग्याची योजना ही वरूनच आहे, त्याला थांबवणे आपल्या हातामध्ये नसल्याचे पालकमंत्री म्हणाले आहेत.
शाळेत दिली जात असलेली लस ही प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या हातून ती मुलांना जबरदस्तीने दिली जात आहे. तसेच याबाबत पालकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही वा त्यांची संमतीदेखील घेतली जात नाही. मृत झालेला ऋषिकेश दोन वेळा लसीपासून वाचण्यासाठी पळून गेला होता, मात्र त्याला पकडून जबरदस्तीनेही लस दिली गेली होती. मात्र यावर जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ही लस देणे आपण थांबवू शकत नसल्याचे सांगितले तसेच पालकांच्या संमतीने त्यांच्यासमोर ही देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिली गेले असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा : अफवांवर विश्वास ठेऊ नका, गोवर-रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित : इंडिअन मेडिकल असोसिएशन)
दरम्यान वैद्यकीय पथकाने या लसीचा अभ्यास करून ती द्यावी, त्याही आधी सर्व मुलांवर सुरक्षा विमा उतरवावा, मगच ती लस द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच ऋषीकेश हा डोंबाळे पालकांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली़ गेली आहे.