WHO ने घेतली धारावीत कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याची दखल; आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मानले धारावीकरांचे आभार
यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, निवडलेले प्रतिनिधी आणि मुख्य म्हणजे धारावीकरांचे आभार मानले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धारावीत (Dharavi) कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याची दखल घेतली आहे. यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, निवडलेले प्रतिनिधी आणि मुख्य म्हणजे धारावीकरांचे आभार मानले आहेत.
व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, न्यूझीलंड, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील घनदाट भाग असणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. या भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण, विलगिकरणाची सोय आणि कोरोना रुग्णांवरील योग्य उपचार आदी कारणांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाला आहे, असं WHO ने म्हटलं आहे. (हेही वाचा - मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 12 रुग्णांची भर पडल्याने आकडा 2359 वर पोहचला, महापालिकेची माहिती)
जागतिक आरोग्य संघटनेने धारावीतील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याची दखल घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. 'मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. ही अत्यंत मोठी बाब आहे. त्यामुळे राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि मुख्य म्हणजे धारावीकरांचे धन्यवाद! कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी असेचं प्रयत्न चालू ठेवा. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या सर्वांचे प्रयत्न ओळखल्याबद्दल WHO चे देखील धन्यवाद!' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धारावीत आज 12 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2359 वर पोहचला आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण हे एकट्या धारावीत आढळून येत होते. मात्र, सरकारच्या अथक प्रयत्नातून सध्या धारावीतील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे या परिसरात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.