Diwali Guidelines 2020: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी; फटाक्यांच्या आतषबाजी वर बंदी
यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी (Avoid Bursting Crackers) घालण्यात आली आहे.
Diwali Guidelines 2020: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळी (Diwali) सणासाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी (Avoid Bursting Crackers) घालण्यात आली आहे. याशिवाय यावर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन नागरिक ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे करू शकतात.
दिवाळी सणासाठी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे -
- कोरोनाच्या पारश्वभूमीवर यंदा राज्यातील नागरिकांनी दिवाळीचा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
- ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांच्या आतषबाजी करू नये.
- फटाक्यांच्या आतषबाजी ऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
- याशिवाय दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये.
- मात्र, नागरिक ऑनलाइन पद्धतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात.
- तसेच नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
- दिवाळीचा सण अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरा करावा.
- दिवाळीचा सण साजरा करताना जास्त गर्दी करू नये. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडणं टाळावं.
दरम्यान, दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा आणि योग्य खबरदारी घेऊन राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्वेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Diwali Vacation 2020 For Schools: महाराष्ट्रात यंदा शाळांना 12-16 नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी; ऑनलाईन वर्ग बंद राहणार)
राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीची बैठक झाली. यावेळी कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला.