महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा सर्व विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली.

कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना यावेळी नाना पटोले यांनी यावेळी केली. (हेही वाचा -Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 413 जणांचा मृत्यू)

दरम्यान, अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.