Nashik: नाशिक येथे भाजप नगरसेविकेच्या पतीकडे मागितली 15 लाख रुपयांची खंडणी

प्रियंका माने असे या नगरसेविकेचे नाव आहे. तर धनंजय उर्फ पप्पू माने असे त्यांच्या पतीचे नाव आहे. नाशिक महापालिका आणि शहरात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

(Archived, edited, symbolic images)

नाशिक (Nashik) येथील एका भाजप (BJP) नगरसेविकेच्या पतीकडे तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचे प्रकरण पुढे आले आहे. प्रियंका माने असे या नगरसेविकेचे नाव आहे. तर धनंजय उर्फ पप्पू माने असे त्यांच्या पतीचे नाव आहे. नाशिक महापालिका आणि शहरात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने खंडणी न दिल्यास अॅट्रेसिटी दाखल करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) असे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आहे. सध्या काही कारणामुळे पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, ही घटना पुढे आल्याने चर्चेला एक नवा विषय मिळाला आहे. घटनेचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. नगरसेविकेचे पती धनंजय माने यांनी या सर्व प्रकारामागे राजकीय विरोध असल्याचा दावा केला आहे. (हेही वाचा, वर्धा: MPSC परीक्षेमध्ये यश मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या 29 वर्षीय तरूणाची आत्महत्या)

धनंजय उर्फ पप्पू माने यांनी म्हटले आहे की, अनिकेत निकाळे याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अनेक खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यांनी (माने) शिवीगाळ करुन मारहाण केल्याबाबतही आपण तक्रार दाखल करणार असल्याचे निकाळे याने त्यांच्या मित्राला सांगितले होते. माने यांनी जर 15 लाख रुपये दिले तर त्यांच्याविरोधात दिलेली तक्रारही आपण मागे घेऊ, अशी तयारी निकाळे याने दर्शवली होती. त्याने आपल्या परीचयाची एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावी आणि सोबत आठ लाख रुपये रोख रक्कमसुद्धा द्यावी अशीही मागणी त्याने केली होती.