Thane Shocker: हेअरकट आवडला नाही म्हणून 13 वर्षांच्या मुलाची आत्महत्या; 16 व्या मजल्यावरून मारली उडी
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
ठाणे (Thane) जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची (Suicide) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हेअरकट आवडला नाही म्हणून कोणी दुःखी होऊन आपले जीवन संपवेल, ही बाब अविश्वसनीय वाटत असली तरी ती सत्यात उतरली आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील ठाण्यातील भाईंदरमधून समोर आला आहे. मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील भाईंदरमध्ये आपले केस लहान कापले गेल्याने संतप्त झालेल्या 13 वर्षांच्या मुलाने मंगळवारी रात्री त्यांच्या 16व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीतून कथितरित्या उडी मारली.
आपले केस लहान केल्याच्या रागाने या मुलाला जीवन संपवण्यास प्रवृत्त केले. या घटनेने परिसरातील नागरिक हादरले असून नवघर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार शत्रुघ्न पाठक असे मुलाचे नाव असून, तो इयत्ता 8वीचा विद्यार्थी होता. रात्री 11.30 च्या सुमारास भाईंदर (पूर्व) येथील न्यू गोल्डन नेस्ट येथील सोनम इंद्रप्रस्थ इमारतीच्या कंपाऊंडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडला.
कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, शत्रुघ्नला त्याच्या चुलत भावाने केस कापण्यासाठी नेले होते. मात्र लहान केस कापल्यामुळे शत्रुघ्न नाराज होता. त्याचे आई-वडील आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो दिवसभर नाराजच राहिला. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास, कुटुंबातील सदस्य झोपायला गेल्यानंतर, तो बाथरूममध्ये गेला आणि ग्रील नसलेल्या खिडकीतून उडी मारली. (हेही वाचा: Chandrapur News: बैल चरायला गेल्याने वाद, 75 वृद्धाची हत्या; चंद्रपुरातील बोर्डा दीक्षित गावात खळबळ)
शत्रुघ्न खाली पडण्याच्या आवाजाने सुरक्षा रक्षक आणि इमारतीतील रहिवाशी उठले व त्यांनी पाहिले असता शत्रुघ्नचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.