Thane: शहरातील विकास कामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे CM Eknath Shinde यांचे आदेश; हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर होणार कारवाई

पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.

CM Eknath Shinde

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पोलीस, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी देतानाच रस्ते खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे आदेशही दिले. शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, ठाणे महानगरपालिकेचे (TMC) आयुक्त, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) सह व्यवस्थापकीय संचालक, अतिरिक्त पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही 1 जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम 60 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तात्काळ एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई- नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख- वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावे अशा सूचना त्यांनी दिल्या. (हेही वाचा: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार येत्या 15 ते 20 दिवसांत कोसळणार; संजय राऊत यांच भाकित)

कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे आपल्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement