ताडोबा व्याघ्र प्रकल्प 30 एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद; बुकींग रक्कम परत मिळणार
त्यानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि बफऱ मधील सर्व उपक्रम बंद राहणार आहेत
राज्यातील कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' (Break The Chain) अंतर्गत आजपासून नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba Andhari Tiger Reserve) सफारी आणि बफर मधील सर्व उपक्रम बंद राहणार आहेत. 15 ते 30 एप्रिल 2021 पर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. परंतु, यापूर्वी तुम्ही जर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे बुकींग केले असल्यास चिंता करण्याचे कारण नाही. कारण बुकींगची पूर्ण रक्कम ऑनलाईन माध्यमातून परत केली जाणार आहे. (ताडोबा मध्ये मास्क शिवाय प्रवेश करणाऱ्या पर्यटकांस भरावा लागणार 1000 रुपयांचा दंड)
www.mytadoba.org या वेबसाईटच्या माध्यमातून बुकींग रक्कम परत केली जाईल. पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत ही रक्कम संबंधित पर्यटकांच्या ई-वॉलेटमध्ये रिटर्न केली जाईल आणि पुढील 6 महिन्यांसाठी इतर बुकींगसाठी पर्यटक ही रक्कम वापरु शकतील. त्याचबरोबर पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा, मेळघाट आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील सर्व सफारी आणि पर्यटनविषयक कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत. (Maharashtra: ताडोबा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ अशा Black Leopard दिसल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या 'या' बिबट्यांच्या मागील रहस्य)
गेल्या वर्षी कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर 1 ऑक्टोबर 2020 पासून ताडोबा मधील पर्यटन खुले करण्यात आले. परंतु, यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 15 दिवसांसाठी पर्यटन बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 1 लाख 65 हजार हून अधिक पर्यटकांनी प्रकल्पाला हजेरी लावली होती.