Supriya Sule On Jitendra Awhad Arrest: जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
हर हर महादेव चित्रपटास विरोध करताना प्रेक्षकांना मारहाण केले प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. हर हर महादेव चित्रपटास विरोध करताना प्रेक्षकांना मारहाण केले प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यास खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev Movie) चित्रपटास विरोध नोंदवताना चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. याच प्रकरणात आव्हाड (Jitendra Awhad Arrested) यांना अटक झाली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जितेंद्र आव्हाड यांच्यवरील कारवाई प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले होते. आव्हाड चौकशीसाठी गेल्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली. आम्ही दबक्या आवाजात चर्चा ऐकत आहोत की, वरुन दबाव होता. त्यांना कोणी बोलावले हे माहिती नाही. तसेच आमचा कोणावर आरोप नाही. राज्यातील पोलीस कार्यक्षम आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परंतू, दबावातूनच त्यांना अटक झाली असावी, असा आमचा कयास आहे. (हेही वाचा, Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हड यांना ठाणे पोलिसांकडून अटक)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आव्हाड यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीला विरोध होता. त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, जे कृत्य त्यांनी केलेच नाही, त्याबद्दल त्यांना अटक केली गेली आहे. आव्हाड यांनी आपण जामीन घेणार नसल्याचे म्हटले आहे. होय, पक्ष त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ताही या दडपशाहीविरोधात जेलभरो आंदोलन करेल असे पाटील यांनी म्हटले.