बीड: रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

बीडमधील नाळवंडी तालुक्यात शनिवारी ही घटना घडली. संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारंवार खेड्यातला म्हणून हिणवल्याने या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

बीड (Beed) जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला (Ragging) कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडमधील नाळवंडी तालुक्यात शनिवारी ही घटना घडली. संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारंवार खेड्यातला म्हणून हिणवल्याने या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे. गणेश कैलास म्हेत्रे (वय, 20 वर्ष) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. गणेशने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून विष प्राशन केले. त्यानंतर 24 तासानंतर त्याचा मृत्यू झाला.

गणेश हा धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर (जि. लातूर) येथे बीएएमएसच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडिल शेतकरी असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जिद्दीने अभ्यास करत होता. मात्र, त्याच्या वर्गातील विद्यार्थी गणेशला नेहमी ‘तू खेडूत आहेस, तू काय डॉक्टर होणार,’ असे टोमणे मारत असतं. त्यामुळे गणेशला प्रचंड नैराश्य येत असे. त्याने या सर्व प्रकारासंदर्भात आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. तसेच गणेशच्या कुटुंबीयांनीदेखील महाविद्यालय प्रशासन आणि संबंधित प्राध्यापकांकडे यासंदर्भात तोंडी तक्रार केली होती. परंतु, तेव्हा पुन्हा असा प्रकार होणार नाही, असं प्राध्यापकांनी गणेशच्या कुटुंबियांना म्हटलं होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांकडून गणेशला टोमणे मारणं चालूचं होतं. (हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेश नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

गणेश 2 दिवसांपूर्वी नाळवंडी येथे आला होता. त्याने शुक्रवारी आपल्या शेतात जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेशच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.