पुणे: हेल्मेटसक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती
या हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी अनेक प्रकारे विरोध केला.
पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली. या हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी अनेक प्रकारे विरोध केला. आता मात्र पुणेकरांवरील हेल्मेटसक्तीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना सूचना दिल्यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नसल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
पुण्यात हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध झाला. हेल्मेट नसल्यामुळे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईवरुन नागरिकांमध्ये नाराजी होती. यासाठी आज पुणे शहरातील आमदरांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पुणे पोलिसांकडून हेल्मेट नसल्यामुळे केली जाणारी दंडवसूली, परवाना ताब्यात घेणे, अरेरावी इत्यादी मुद्दे मांडण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्तीला स्थगिती देण्याची आमदारांची विनंती मान्य केली आणि पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना देण्यात आल्या. (पुण्यानंतर नाशिक शहरात हेल्मेटसक्ती जोरात, नाशिककर मात्र पुणेकर नागरिकांप्रमाणेच विरोधात)
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर पुणेकरांना तात्पुरता तरी हेल्मेटसक्तीपासून दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.