Maharashtra: 'शिवसेनेत अंतर्गत खदखद आहे' रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे (Shiv Sena) पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या कथित ऑडिओ क्लिपने (Audio Clip) राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
शिवसेनेचे (Shiv Sena) पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या कथित ऑडिओ क्लिपने (Audio Clip) राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी? यावर मी भाष्य करणार नाही. परंतु, हे निश्चित आहे की, शिवसेनेत अंतर्गत खदखद आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. ते आज नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी हे मला माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणार नाही. मात्र, एक निश्चित आहे की, शिवसेनेत अंतर्गत खदखद आहे. मी त्या पक्षात नाही. त्यामुळे त्या पक्षातील नेते त्यांवर काय कारवाई करायची आहे ती करतील. मात्र अनेक वर्ष सोबत असलेले शिवसेनेचे नेते एकमेकांना भेटतात आणि आपली व्यथा मांडतात. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची खदखद मोठी आहे", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस (Watch Video)
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर स्वत: रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्या ऑडिओ क्लिप बनावट आहेत. अनिल परब हे माझे जवळचे मित्र असून किरीट सोमय्या यांना गेल्या पंधरा वर्षात मी एकदाही भेटलो नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्या दोघांनी कधीकाळी माझ्या हाताखाली काम केले आहे. ते शिवसेनेशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. संजय कदम यांचा माझ्या मुलाने पराभव केला आहे. तर, वैभव खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मी उघड केली आहेत. यामुळे हे दोघेही माझ्याविरोधात कुरघोड्या करीत आहेत. त्यानी गेल्या तीन महिन्यात माझ्याविरोधात अनेक पत्रकार परिषद घेतल्या आहेत. या दोघांवर मी अब्रु नुकसानीचा दावा टाकला आहे", असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी फडणवीसांकडे सरकार दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे.