'माझ्याविरोधात दाखल केलेली तक्रार पूर्णतः खोटी'; भष्ट्राचाराच्या आरोपांवरुन अनिल परब यांचे ट्विटद्वारे स्पष्टीकरण

या तक्रारीत त्यांनी अनिल परब यांच्यासह आरटीओ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Anil Parab | (File Photo)

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरुद्ध नाशिक (Nashik) मधील पचंवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी अनिल परब यांच्यासह आरटीओ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले असून तक्रार पूर्णत: खोटी व निराधार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच माझ्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या बदनामीचे हे षडतंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनिल परब यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5  अधिकाऱ्यांविरोधात नाशिक मधील पंचवटी पोलीस स्टेशन येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे.

"मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे. नाशिक पोलिस या प्रकरणी तपास करत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर येईल," असेही ते पुढे म्हणाले.

अनिल परब ट्विट्स:

आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होत असून 300 कोटींचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. 31 मे नंतर ते उपस्थित राहण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. (Sanjay Raut on Anil Parab: अनिल परब यांच्या शपथेवर विश्वास, सच्चा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेणार नाही- संजय राऊत)

दरम्यान, मनसेने देखील या प्रकरणावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी '100 कोटी महावसूली 300 कोटीवर' असं म्हणत गृहमंत्री वळसे पाटील याची निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवालही उपस्थित केला आहे.