ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न
एसटी कडे 16 हजार 500 बसेस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने-आण करते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे.
राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या (ST) पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एस टी महामंडळाने बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाने काम करावे. गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख एसटीची सेवा असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये कॉंक्रिटीकरण पूर्ण करून बसपोर्ट ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एसटीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 7 हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. (हेही वाचा: Shivsrushti: राज्यामध्ये सहा ठिकाणी उभारली जाणार शिवसृष्टी; पर्यटन व रोजगाराला चालना, जाणून घ्या ठिकाणे)
दरम्यान, राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटी कडे 16 हजार 500 बसेस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने-आण करते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.