साताऱ्यात धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने एसटी बसला भीषण अपघात
एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने बस दुभाजक ओलांडून विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
साताऱ्यामध्ये (Satara) एसटी बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने बस दुभाजक ओलांडून विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सातारा शहराजवळील खिंडवाडी (Khindwadi) गावाच्या हद्दीत झाला. अपघात ग्रस्त बस मुंबईहून कऱ्हाडकडे जात होती. (हेही वाचा - मध्य प्रदेश: ध्यानचंद हॉकी टूर्नामेंट मधील सेमीफाइनल सामना खेळायला जाणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाला अपघात; 4 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी)
अपघाक ग्रस्त एसटी बस (एमएच 20 बीएल 3667) सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी परिसरात आली. दरम्यान, एसटी चालक विकास मारूती पवार (वय 39, रा. तळमावले, ता. पाटण) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पवार यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी बस दुभाजक तोडून विरुद्ध लेनवर गेली आणि त्या लेनवरून येणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडीत अडकली. या अपघातात बऱ्याच प्रवाशांच्या डोक्याला आणि हाता-पायाला जखम झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.
हेही वाचा - रेल्वेच्या ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी बसमध्ये मिळणार ‘नाथ-जल’
प्रवाशांना बसमधून खाली उतरल्यानंतर एसटी चालक विकास पवार स्टेअरिंगवर बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर प्रवाशांनी तत्काळ एसटी चालक पवार आणि जखमी प्रवासी अमित आत्माराम मोतमकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच एसटीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.