SSC, HSC Exam 2021 ठरलेल्या वेळेतच होणार; अफवांना बळी न पडण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन
दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परीक्षाबाबत सोशल मीडिया माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत.
दहावी (SSC), बारावी (HSC) च्या परीक्षा वेळापत्रानुसारच होणार असून त्याबाबतच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने केले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परीक्षाबाबत सोशल मीडिया माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. यावरुन विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये, म्हणून शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी करत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून त्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे अफवांना बळी न पडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांतच बोर्डाकडून परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. (Maharashtra SSC, HSC Exam 2021 Question Banks जाहीर; 10वी, 12 वीचे विद्यार्थी maa.ac.in वर डाऊनलोड करू शकतात विषयनिहाय प्रश्नपेढी)
मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे शालेय वर्ष उशीराने सुरु झाले. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. दरम्यान, यंदा 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. तर 10 वी ची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीत पार पडेल. नुकतीच परीक्षांसाठी प्रश्नपेठी जारी करण्यात आली आहे.
यंदा दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्यात आणि बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे दहावीचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्याचबरोबर दहावी, बारावीचे निकालही उशीराने लागले. दरम्यान, आता पुन्हा एकदा कोविड-19 चा संसर्ग वाढू लागल्याने परीक्षांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र परीक्षा वेळेतच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.