Shankarrao Mohite Patil Sahakari Bank: आरबीआयकडून शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर निर्बंध लागू, प्रतिदिन केवळ 5 हजार रुपयेच काढता येणार; जाणून घ्या सविस्तर

आरबीआयने (RBI) शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.

RBI | (File Image)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकलूज (Akluj) येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank) सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या करड्या नजरेखाली आली आहे. आरबीआयने (RBI) शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांना या बँकेतून आता पैसे काढण्यासाठी प्रति ग्राहक 5,000 रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. ज्याचा बँक ग्राहकांना चांगलाच मनस्ताप होतो आहे. दरम्यान, आरबीआयने लागू केलेले निर्बंध किंवा निर्देश बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35 अ अंतर्गत असून ते शुक्रवार (24 फेब्रुवारी 2025) पासून बँकिंग कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपासून लागू असतील.

आरबीआयने अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधानुसार बँक आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व घेऊ शकत नाही आणि तिच्या कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाटही लावू शकत नाही. दरम्यान, बँकेतील सर्व बचत किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून प्रतिदिन प्रति ग्राहक, 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. पाच हजार रुपयांच्या मर्यादेत राहूनच बँकेला हे व्यवहार करावे लागतील. (हेही वाचा, Bank Locker New Rules: RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम; ग्राहकांना 'असा' मिळणार फायदा, वाचा सविस्तर)

RBI ने म्हटले आहे की, 24 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेचे कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू राहतील आणि ते पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. दरम्यान, हे निर्देश म्हणजे बँकेचा परवाना रद्द झाला आहे असे समजले जावू नये. बँकेचा व्यवसाय आणि कामगिरी सुधारेपर्यंत निर्बंध कायम राहीतल. व्यवसाय आणि कामगिरी सुधारल्यानंतर बँकेवरील निर्बंध हटविण्यात येतील. दरम्यान, पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून त्याच्या/तिच्या ठेवींची रु. 5 लाखांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.