DJ operator | Representational image (Photo Credits: pxhere)

Solapur DJ Operator News: कर्नाटक (Karnataka) राज्यात झालेल्या बेदम मारहाणीत सोलापूर येथील डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रमोद अंबादास शेराल असे त्याचे नाव आहे. तो 32 वर्षांचा होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील इंडी येथे डीजे वाजविण्याची सुपारी मिळाली होती. दरम्यान, तिथे त्याला अज्ञातांकडून बेदम मारहाण झाली. ज्यात त्याचा उपचारादरम्यन मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी त्याला जखमी अवस्थेत घरासमोर आणून सोडल्याचा दावाही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

डीजे ऑपरेटर प्रमोद शेराल हा अत्यंत गरीब घरातील तरुण आहे. डीजे ऑपरेटर म्हणून काम करुन तो कुटुंबाला हातभार लावत असे. पाठिमागच्या काही दिवसांपूर्वीत त्याला कर्नाटकातील एका गावात डीजे वाजविण्याची सुपारी मिळाली. त्यासाठी तो तिकडे गेले असता त्याला अज्ञातांकडून बेदम मारहाण झाली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी रात्रीच्या वेळी त्याला घरासमोर आणून सोडले. त्यावेळी तो प्रचंड जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

प्रमोद याच्या अंगावर येवढ्या जखमा कशा झाल्या, त्याला कोणी मारहाण केली की, त्याच्यासोबत काही घातपात झाला. अज्ञात व्यक्तींनी त्याला घरासमोर आणून कसे सोडले, त्या व्यक्ती कोण होत्या. त्याला मारहाण होण्याचे नेमके कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रमोद हा कुटुंबातील होतकरु तरुण होता. घरामध्ये तो एकमेव कमावता व्यक्ती होता. ज्यामुळे त्याच्या निधनानंतर कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी घटनेची नोंद घ्यावी. तसेच, कर्नाटक पोलिसांसी संपर्क साधून चौकशी करावी आणि आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

डीजे ऑपरेटर कोणाला म्हणतात

जो व्यक्ती उपस्थित जनसमुदयासाठी ध्वनिमुद्रीत केलेले संगित ध्वनीसंचावर प्रत्यक्ष वाजवतो. उपस्थित जनसमुदयाचा कल पाहून त्यानुसार संगित आणि त्याची लय बदलतो. कधी कधी दोन गाणी अथवा संगितांच्यामध्ये काही संवादफेक करुन उपस्थितांचे मनोरंजन करतो. त्यांना थिरकण्यास कारण मिळवून देतो. ज्या योगे उपस्थितांच्या आनंदाला, उत्साहाला भरते येते अशा व्यक्तीस डीजे ऑपरेटर असे अनेकांकडून संबोधले जाते.