Shiv Sena Dasara Melava 2023: शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी BMC कडून ठाकरे गटाला परवानगी मंजूर
तर ठाकरे गटाला बीएमसीच्या जी उत्तर विभागाने परवानगी दिली आहे.
मुंबई मध्ये दसरा मेळाव्यासाठी (Shiv Sena Dasara Melava) पुन्हा शिंदे विरूद्ध ठाकरे समोरासमोर ठाकले होते. यामध्ये काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आला आणि ठाकरेंसाठी रस्ता मोकळा झाला होता. पण मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) परवानगी बाकी होती. आज (12 ऑक्टोबर) अखेर बीएमसीने ठाकरे गटाला दसरा मेळावा शिवाजी पार्क वर घेण्यास मंजूरी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून दसरा मेळावा शिवाजी पार्क वर घेतला होता. त्यांच्या पश्चात हा मेळावा उद्धव ठाकरे घेत होते. पण दीड वर्षापूर्वी पक्षात उभी फूट पडल्यानंतर मागील वर्षी पहिल्यांदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबई मध्ये पार पडले होते.
शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान सोडल्यानंतर दक्षिण मुंबईत मैदानांची चाचपणी सुरू केली आहे. तर ठाकरे गटाला बीएमसीच्या जी उत्तर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 24 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून शिंदे गटासह सरकारला काय सुनवणार? सोबतच आगामी निवडणूकांसाठी त्यांच्या गटाचं मनोबल उंचावण्यासाठी काय टॉनिक देणार या सार्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ट्वीट करत मोठ्या संख्येने शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केले आहे. यंदा ठाकरेंकडून 1 ऑगस्टलाच शिवाजी पार्कसाठी अर्ज दिला होता. त्यानंतर 7 ऑगस्टला शिंदे गटाने अर्ज केला होता. पालिकेने वेळेत परवानगी दिली नसती तर ही लढाई देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्याची तयारी ठाकरे गटाने केली होती. शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्याने यामध्ये काही राजकीय खेळी आहे का? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत होती.
मागील वर्षी ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थ वर तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीच्या ग्राऊंडवर झाला होता.
शिंदे गटाकडून टीकास्त्र
"बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल."असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्वीटर द्वारा आपली प्रतिक्रिया देताना . छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? अशी बोचरी टीकाही केली आहे.