राज्यातील शिवभोजन केंद्र 3 तास सुरू राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील लॉकडाऊन परिस्थिती असल्याने मोल-मजुरांची जेवणाची गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवभोजन केंद्र 3 तास सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

राज्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील लॉकडाऊन परिस्थिती असल्याने मोल-मजुरांची जेवणाची गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिवभोजन केंद्र (Shiv Bhojan Canteens) 3 तास सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे.

यापूर्वी शिवभोजन केंद्र 2 तास सुरू ठेवली जात असतं. मात्र, आता शिवभोजन केंद्र 2 तासाऐवजी 3 तास सुरू राहणार आहेत. ठाकरे यांनी शिवभोजन केंद्राची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. नागरिकांनी शिवभोजनाचा आस्वाद घेताना गर्दी करू नये, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शिवभोजन केंद्रात जेवण करताना अंतर ठेऊन बसा, अशा सुचनाही ठाकरे यांनी जनतेला दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून यांसंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईत 5, नागपूरमध्ये 1 नवा रुग्ण; राज्यातील COVID-19 बाधितांची संख्या 159)

राज्यात आज कोरोना व्हायरसचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 5 रुग्ण हे मुंबई शहरातील असून एक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 834 इतकी झाली आहे. यातील 67 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.