Maharashtra Assembly Eections 2019: शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचे 'शेर आया, शेर आया' रॅप साँग व्हायरल; पहा व्हिडीओ
इथून त्यांना तशी कोणाची भीती नसली तरी, त्यांचा प्रचार जोरदार चालू असलेला दिसून येतो.
150 पेक्षा जास्त एनकाउंटर केलेले प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) सध्या शिवसेनेकडून (Shiv Sena) नालासोपारा मतदारसंघात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Eections 2019) लढवत आहे. इथून त्यांना तशी कोणाची भीती नसली तरी, त्यांचा प्रचार जोरदार चालू असलेला दिसून येतो. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या प्रचारासाठी बनवलेले ‘शेर आया, शेर आया’ हे गाणे अतिशय व्हायरल होत आहे. गली बॉय चित्रपटातील रॅप साँगच्या धर्तीवर हे गाणे बनवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे गाणे नालासोपारा मतदारसंघातील मुलांनीच गायले आहे. याधी कॉंग्रेसने ही प्रचारासाठी रॅप साँग बनवून तरुणांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला होता.
शेर आया, शेर आया गाण्याचा व्हिडीओ -
गाण्याची सुरुवात प्रदीप शर्मा यांच्या काही मोंताजने होते. यामध्ये प्रदीप शर्मा यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. त्यानंतर या मतदारसंघातील समस्या दिसून येतात. मतदारसंघातील अनधिकृत बांधकाम, वाहतुकीची समस्या, पावसात निर्माण होणारी पूरपरिस्थिती, पाणीप्रश्न असे मुद्दे यात मांडण्यात आले आहेत. त्यानंतर लवकरच या सर्व समस्या दूर होतील कारण आता प्रदीप शर्माच्या रूपाने ‘शेर आया’ असा संदेश दिला जातो. एखादे चित्रपटातील गाणे असावे असे हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचे संकलन. अतिशय उत्तम रित्या हे गाणे एडीट झाल्याने त्याचा प्रभाव जाणवतो. (हेही वाचा: Shiv Sena Manifesto 2019: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर; सत्तेत आल्यावर देणार 10 रुपयात थाळी, 1 रु. मध्ये आरोग्य तपासणी)
दरम्यान, प्रदीप शर्मा हे ‘एनकाउंटर स्पेशलीस्ट’ म्हणून ओळखले जातात. तब्बल 35 वर्षांची कारकीर्द गाजवून पोलिस दलाचा राजीनामा दिल्यानंतर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या विधानसभेला त्यांच्यासमोर वंचितचे प्रवीण गायकवाड आणि अपक्ष क्षितीज ठाकूर यांचे आव्हान असणार आहे.