Shahapur Accident: शहापूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर; गुन्हा दाखल, अपघाताची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळला देणार भेट

या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे.

Shahapur Accident (संग्रहित संपादित प्रतिमा)

शहापूर (Shahapur Accident) तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघाताततील मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, झालेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनांचा लाँचर आणि 1 हजार 250 टनांचा गर्डर आहे. हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्देवाने लाँचर आणि गर्डर पडल्याने ही घटना घडली आहे. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

या ठिकाणी 28 जण काम करीत होते. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे. लाँचर आणि गर्डर कशामुळे पडला याचा तपास करण्यात येईल. या चौकशीमध्ये जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. (हेही वाचा: Maharashtra Rains: पुढील 24 तासांकरिता कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही; जाणून घ्या आपत्तींच्या चेतावणी व मदतीसाठी उपयुक्त ॲप्स आणि फोन नंबर)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनी देखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करणाऱ्या व्हीएसएल कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.