पुणे : 'मला एलियन दिसला'; PMOचा मेल पाहून पुणे पोलिसांची उडाली झोप
त्यामुळे त्याचे मानसिक संतूलन बिघडलेआहे. काही दिवसांपूर्वी त्याने घरासमोरील झाडावर अंधारात पडलेला उजेड पाहिला आणि त्याला तो उजेड म्हणजे एलियन सारखा प्रकार वाटला. त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाला मेल केला.
आपल्या घराबाहेर एलियन (Alien) दिसल्याचा दावा पुणे (Pune) शहरातील एका व्यक्तिने केला आहे. हा दावा करतानाच या व्यक्तिने पंतप्रधान कार्यालयालाही (PMO) ई-मेलद्वारे या प्रकाराची माहिती दिली. या पत्रात एलियन आपल्याला सतत संपर्क करत असल्याचा दावाही त्याने केला. या प्रकारानंतर पुणे पोलिसांमध्ये (Pune Police) एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास कार्यास सुरुवात केली. या तपासात भलतेच सत्य पुढे आले. एलियन पाहिल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तिचे मानसिक संतूलन बिघडले असून, गेल्या काही काळापासून हा व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त, असल्याचे पुढे आले आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथे राहणाऱ्या या व्यक्तिने पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये त्याने आपल्या घराबाहेर एक एलियन सदृश्य वस्तू (ऑब्जेक्ट) पाहायला मिळाल्याचा दावा केला होता. पीएमो कार्यालयाने हा मेल महाराष्ट्र सरकारला फॉरवर्ड केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकाराच्या तपासाची जबाबदारी घेतली आणि तपास सुरु केला. (हेही वाचा, Alien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा)
या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पोलिस तपासात पुढे आले की, हा व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून ब्रेन हॅमरेज या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतूलन बिघडलेआहे. काही दिवसांपूर्वी त्याने घरासमोरील झाडावर अंधारात पडलेला उजेड पाहिला आणि त्याला तो उजेड म्हणजे एलियन सारखा प्रकार वाटला. त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाला मेल केला. या व्यक्तिला वाटले की, तो एलियन आपल्याला प्लॅनेटबद्दल काहीतरी माहिती पाठवतो आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी करत त्याने मेल केला. विशेष म्हणजे या व्यक्तिने असा मेल केल्याची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती नव्हती, असे या अधिकाऱ्याने सांगितले.