भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील, जे उखडायचे ते उखडा - संजय राऊत यांचे आव्हान उद्या शिवसेना भवनात होणार पत्रकार परिषद

आता तुम्हाला कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, असं विधान संजय राऊतांनी करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

मागील काही दिवसांमध्ये शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध भाजपा (BJP) हा वाद तीव्र होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडूनही आक्रमक भूमिका पहायला मिळत आहे. अशामध्ये आज मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी 'डोक्यावरून पाणी गेलं आता, लवकरच भाजपाचे साडेतीन लोकं तुरूंगात जाणार' असं म्हणत त्यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. यावेळी उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, असं विधान संजय राऊतांनी करत भाजपावर हल्लाबोल केला आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार असं संजय राऊतांनी वक्तव्य केल्याने आता ही भाजपाची लोकं कोण असणार? या नावांची उत्सुकता वाढली आहे. नक्की वाचा: Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधकांना पुन्हा इशारा,' सरकारही पडणार नाही, मीही झुकणार नाही, जय महाराष्ट्र' .

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी व्यकंय्या नायडू यांना पत्र लिहित महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी संपर्क केला जात असल्याचं, त्यासाठी धमकी दिली जात असल्याचं म्हटलं होते तसेच केंद्रीय तपास यंत्रणा यांचा गैरवापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जात आहे. त्यामध्ये सहभागी फुलवाले, डेकोरेटेर्स यांना बोलावून त्यांची चौकशी करून त्यांना त्रास दिला जात असल्याचंही म्हटलं आहे.