Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री

या कलांवरुन राजकीय पक्षांचे प्रतिनीधी प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर एनडीएवर थेट हल्ला चढवताना काँग्रेस देशभरातून 150 जागा जिंकत असल्याचे प्राथमिक कलांवरुन दिसते आहे. त्यामुळे हे कल म्हणजेच 'नरेंद्र मोदी यांच्या निरोप समारंभ पूर्ण झाला', असे म्हटले आहे.

Sanjay Raut, PM Narendra Modi | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

लोकसभा निवडणूक निकाल (Lok Sabha Election Results) हळूहळू जाहीर होत आहेत. अद्याप कोणत्याही जागेचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही. असे असले तरी, संपूर्ण देशभरातील प्राथमिक कल हाती येत आहेत. या कलांवरुन राजकीय पक्षांचे प्रतिनीधी प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर एनडीएवर थेट हल्ला चढवताना, महाराष्ट्रात महाविकासआघाडी आणि केंद्रात इंडिया आघाडी स्पष्ट बहुमत मिळवत आहे. काँग्रेस देशभरातून 150 जागा जिंकत असल्याचे प्राथमिक कलांवरुन दिसते आहे. त्यामुळे हे कल म्हणजेच 'नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निरोप समारंभ पूर्ण झाला', असे म्हटले आहे.

संजय राऊत यांना प्रचंड आत्मविश्वास

लोकसभा निवडणूक निकालांदरम्यान प्राथमिक कलांबाबत भाष्य करताना संजय राऊत प्रचंड आत्मविश्वासात दिसत होते. ते म्हणाले, देशातील नागरिक भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायाने नरेंद्र मोदी सरकारला नाकारताना दिसत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष चांगली कामगिरी करतो आहे. तर, देशातही राहुल गांधी यांनी घेतलेले परिश्रम यशात परावर्तीत होताना दिसत आहेत. प्राथमिक कलांवरुन फार भाष्य करणे योग्य नाही. मात्र, जे काही आकडे येत आहेत ते पाहता जनतेच्या मनात असलेला भाजपविरोधातील रोष आम्हाला स्पष्ट दिसत आहे. देशभरात काँग्रेस किमान 150 जागा जिंकत आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे यश म्हणजेच 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ झाला' असे आम्ही मानतो, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Stock Market: शेअर बाजार 2,700 अंकांनी कोसळला; लोकसभा निवडणूक ट्रेंड Sensex,Nifty साठी निराशाजनक)

लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान

दरम्यान, संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या 543 सदस्यीय लोकसभा सभागृहासाठी या निवडणुका पार पडत आहेत. त्यापैक दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झाले. मतदारांच्या पात्रतेच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी असलेल्या या निवडणुकीसाठी 96.8 कोटी लोक मतदानासाठी पात्र ठरले. जे लोकसख्येच्या सुमारे 70% आहेत. उष्णतेची लाट असूनही, भारताने 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांसह जागतिक विक्रम प्रस्थापित केला. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2024: भाजप 216 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर)

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 543 पैकी 353 जागा जिंकल्या आणि एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 52 जागा जिंकल्या. ही कामगिरी काँग्रेससाठी 2014 च्या 44 जागांच्या तुलनेत थोडी सुधारणा दर्शवणारी राहिली. 2019 च्या निवडणुकीत 67.11% मतदान झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक नोंदवले गेले.