Samruddhi Mahamarg: अखेर 15 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला होणार 'समृद्धी महामार्ग'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

या प्रकल्पासाठी राज्य 55,000 कोटी रुपये खर्च करत आहे. महामार्गावर 24 इंटरचेंज, 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 38 पूल आणि 30 मीटरपेक्षा कमी लांबीचे 283 पूल असतील.

समृद्धी महामार्ग (Photo Credit : Twitter)

बहुप्रतिक्षित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अखेर 15 ऑगस्टपासून अंशतः वाहतुकीसाठी खुला होणार आहे. प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या म्हणण्यानुसार, शिर्डी आणि नागपूर दरम्यानचा 520 किमीचा पट्टा प्रथम खुला केला जाईल. आतापर्यंत या मार्गाचे काम 95% पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुर्ला येथे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात या नवीन उद्घाटन तारखेबद्दल माहिती दिली. एमएसआरडीसीनुसार मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या संपूर्ण 701 किमी कॉरिडॉरचे काम 85% पूर्ण झाले आहे आणि हा मार्ग 2023 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यावर्षी 2 मे रोजी शेलू बाजार वाशीम ते नागपूर दरम्यान किमान 210 किमीचा पट्टा सुरू करण्याची योजना आखली होती. मात्र, वन्यजीव ओव्हरपासच्या कमानाची रचना कोसळल्याने ही योजना पुढे ढकलण्यात आली. या दुर्घटनेत एका मजुराचाही मृत्यू झाला होता. जे स्ट्रक्चर कोसळले ते नागपूर जिल्ह्यातील शिवमडका-खडकी आमगाव येथील पॅकेज-1 अंतर्गत होते.

एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार आता समृद्धी महामार्गाचे तीन भाग करण्यात आले आहेत. भाग 1 मध्ये, शिर्डी ते नागपूर दरम्यानचा 520 किमीचा रस्ता खुला केला जाणार आहे. भाग 2 मध्ये, अतिरिक्त 103 किमीचा रस्ता खुला केला जाईल ज्यामुळे इगतपुरी आणि नागपूर दरम्यान 623 किमीचा महामार्ग वाहतुकीच्या कक्षेत येईल आणि भाग 3 मध्ये, 2023 पर्यंत संपूर्ण 701 किमीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. (हेही वाचा: राज्यात 1 जूनपासून पावसामुळे 104 जणांचा मृत्यू; मुंबईसह अनेक ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा पाऊस)

आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या महामार्गाकडे पहिले जाते. या प्रकल्पासाठी राज्य 55,000 कोटी रुपये खर्च करत आहे. महामार्गावर 24 इंटरचेंज, 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 38 पूल आणि 30 मीटरपेक्षा कमी लांबीचे 283 पूल असतील. या हायवेचा ड्रायव्हिंग स्पीड डिझाइन 150kmph आहे. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.