Road Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणखी दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू
गुजरातकडे निघालेली कार आमगाव येथे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला धडकली. अहवालात म्हटले आहे की, या अपघातामध्ये टेम्पो चालक भुवनेश्वर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत
व्यावसायिक सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाल्यापासून, या रस्त्याची तपासणी सुरू आहे. मिस्त्री यांच्या आधी किती वाहनचालकांना या मार्गावर आपला जीव गमवावा लागला असेल, याचीही चर्चा सुरु आहे. आता अहवालानुसार, दोन दिवसांत या महामार्गावर दोन भीषण अपघात झाले आहेत. यातील एका अपघातामध्ये महामार्गावरील तलासरीजवळ सुरतमधील तीन व्यापारी आणि एका टेम्पो चालकासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला.
या अपघातामध्ये कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सुरतच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मिडडे मधील एका वृत्तात पोलिसांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, भूपेंद्र मोरया, वीरेन मिश्रा, अजय आणि राजेश देसाई हे सर्व सुरतचे व्यापारी मुंबईवरून गुजरातला जात होते. एका तीव्र वळणावर त्यांचे वाहन तलासरी येथे दुभाजकाला धडकले. त्याचवेळी कार दुसऱ्या बाजूने येणाऱ्या टेम्पोवर आदळली
या अपघातामध्ये मोरया, मिश्रा, देसाई आणि टेम्पो चालक श्रीकृष्ण मिश्रा यांचा मृत्यू झाला. देसाई बंधूपैकी एकावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळाजवळ अंधार असल्याने भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळली असावी, असे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: शिवशाही बस आणि कंटेनरचा पुणे येथे भीषण अपघात, एक ठार, 6 गंभीर जखमी)
यासह टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या मार्गावर आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त आहे. गुजरातकडे निघालेली कार आमगाव येथे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला धडकली. अहवालात म्हटले आहे की, या अपघातामध्ये टेम्पो चालक भुवनेश्वर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत, तर कार चालक आणि सहप्रवासी द्वानीथ पटेल आणि राठोड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.