रत्नागिरी: कशेडी घाटात भीषण अपघात; खाजगी बस 50 फूट दरीत कोसळून एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
ही बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा हायवे (Mumbai Goa Highway) मार्गावरील कशेडी घाटात (Kashedi Ghat) एका खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. ही बस तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. पहाटे 4 च्या सुमारास चिंतामणी नावाची खाजगी बस दरीत कोसळून हा अपघात झाला. ही बस मुंबई (Mumbai) मधील सायन (Sion) हून कणकवली (Kankavali) ला जात होती. या बसमध्ये 27 प्रवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात झाली. दरम्यान, 25 जणांना बाहेर काढण्यात आलं असून यात 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पोलादपूर मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Kolhapur Accident: धक्कादायक! कोल्हापूर येथे मारुती कार आणि एस.टी बसमध्ये भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू)
प्राप्त माहितीनुसार, मृत पावलेल्या मुलाचे नाव साई राणे असे होते. तो देवगडचा रहिवासी असून बसमधील बहुतांश प्रवासी संगमेश्वर येथील होते. दरम्यान, बस दरीत कोसळल्यानंतर 50 फूटावर एका झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अद्याप अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला-मनमाड रोडवर भीषण कार अपघात झाला होता. त्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले होते. एका वाहनाच्या जोरदार धडकेमुळे हा अपघात झाला होता.
कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या. स्वगृही पायी परतणाऱ्या अनेक स्थलांतरीत मजूरांना विचित्र अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते.